चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची. बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात? नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...