चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे,
गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.
बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं.
पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर.
खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?
नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत जिन्याच्या दारावर लक्ष गेले तर त्याचे लाकूड देखील पाऊस आणि उन्हाचा मारा खाऊन कुजून गेलेले, ते बघून नक्की झाले की हे घर कमीत कमी २-३ वर्ष तरी बंद असणार.
आपल्याला येतोच ना असा प्रश्न की काय असेल ह्या घराची काय कथा किंवा व्यथा असेल, का सोडून गेले असतील लोक हे घर? घराच्या मालकाने का लक्ष दिले नसेल? घराला बोलता आल असतं तर ते नक्की ओरडून ओरडून म्हणाल असतं की बघा कशी अवस्था झालीय माझी? ते कुजलेल दार पण म्हणाल असतं की बाबांनो कमीतकमी मला तर थोड उघडून बघा!
काय गोष्ट असेल ह्या घराची? भुताटकी वगेरे? नाही शक्य नाही, मग खालची दुकान पण कदाचित बंद पडली असती. मग काय? की ह्या सिमेंट स्लॅब च्या घरांपुढे इथल्या राहणाऱ्या माणसांना पण आधुनिक घराची ओढ लागली?
माणसाचं असच काहीस होत ना? जोपर्यंत हातात काहीच नसतं तोपर्यंत हाताला येईल त्याला पकडून तो पुढे जातो, पुढे अजून काही चांगलं भेटलं की जून्याला सोडून देतो आणि त्या नवीन गोष्टीला पकडून पुढे जातो. जुन्याची तशी काय फार काळजी राहत नाही.
पण जशी पाणीपुरी प्लेट संपली आणि भैया ला पैसे पे करायला लागलो तेवढ्यात लक्षात आल की कदाचित खालच्या दुकानदाराच्या च खोल्या असतील का त्या? आणि मग पैसे जमा झाले की तो ही इमारत पाडून नवीन उभी करील, म्हणजे त्या घराला नवीन रूप येईल, कदाचित पुन्हा ह्या भागातली सगळ्यात चांगली इमारत होईल? किंवा अस होणारच नाही, काही वर्षांनी दुकानदार सुद्धा दुकान बंद करून टाकेल, पुढे जाऊन एखादा बिल्डर ती आणि शेजरपाजारच्या २-४ जागा विकत घेईल आणि एक मोठं कॉम्प्लेक्स बांधेल. आपल्या लेखी काय, तिथे कोणी राहत नाही म्हणजे त्या घराची गोष्ट संपली पण कदाचित हा फक्त एक प्रसंग असेल आणि गोष्ट अजून बाकी असेल.
गोष्ट अजून बाकी असेल का?
(भाग १ समाप्त; To be continued)
Comments