"अरे उठ की आता, १० वाजले", आई अगदी किंचाळून उठवत होती मला! आणि मग शेवटचा उपाय म्हणून तीने टेबल वरचा तांब्या उचलला आणि माझ्या तोंडावर रिकामा करून मोकळी झाली!
"आई!", अगदी झोपायच्या आधी किंवा उठल्या नंतर मला किती पण त्रास द्या फक्त झोपेतून उठवायच नाही, नायतर मग माझ डोक सटकतच! "सुट्टीच चालू आहे की आई कशाला उठवलस", मी कितीही तक्रार करू देत पण आमची आई त्याला एकाच प्रकारे उत्तर देते 'गप्प बसून' कारण तीला माहीती आहेच शब्दाला शब्द वाढला आणि बाबांना बोलवायची गरज पडली तर किती प्रकारच्या शिव्या पडतात मला ते!
आई च्या खास आग्रहास्तव मी पण मग उठून, आवरून, आंघोळीला गेलो!
बाथटब वगेरे असल्या फाजील लाडांना आमच्या घरी जागा नाही, गॅस गीझर चालू केला आणि बादलीत पाणी सोडल आणि बादली भरायची वाट बघू लागलो!
बादलीत पडणाऱ्या पाण्याचा आवाज जस जस पाणी वाढत होत तसा तसा कमी होत होता, तोपर्यंत काय टाईमपास करायचा आणि किती वेळ बादलीकडे बघत बसायच म्हणून मी शेजारच्या आरश्यात बघून दाढी कुरवाळत बसलो. तेवढ्यात मागून आवाज आला,
"शूऽऽशूऽऽक शूऽऽशूऽऽक"
मागे वळून बघितल पण परत विचार केला च्यायला आता बाथरूम मध्ये कोण येणार आणि ते पण मी आत असताना?!
"शूऽऽशूऽऽक शूऽऽशूऽऽक" (परत तोच आवाज) काहितरी काय अस कस होइल!?! नळाचा आवाज असेल हवेच्या दबावामूळे झाल असेल!
"शूऽऽशूऽऽक शूऽऽशूऽऽक" ( परत ??) मी तसच टॉवेल गुंडाळून दरवाजा उघडून पाहिला तर बाहेर पण कोणी नाही. "माझेच कान वाजत असतील", मी स्वतःशीच पण मोठ्याने म्हणालो. तेवढ्यात परत आवाज आला, " तरूण वयातच कान वाजायला लागले काय तुझे?" , झटक्यात दचकलो मागे बघितल , खिडकीत गेलो वाकून बाहेर बघितल, वरती पाहिल, खाली पाहिल पण आवाज असा कसा आला अचानक? "इकडे बघ, इकडे खाली, बादलीत; इथ पाण्यात आहे मी" माझे डोळे विस्फारले, कडाक्याच्या थंडीत पण घाम फुटायला लागला.
"कक्क्कोण?", कापरा आवाज म्हणजे काय हे मला तेव्हा कळाल. "मी ! तुला न्यायला आलोय", तो आवाज. "कुकुकुठे?", माझी अवस्था बघण्यासारखी होती.
"तिकडे", तो आवाज आता जास्त स्पष्ट होत होता! माझी घाबरगुंडी बघून तो आवाज काढणारा मनातल्या मनात खूप हसत असणार, इकडे माझी मात्र बिकट अवस्था झाली होती. "जरा बादली च्या जवळ ये, एक गम्मत दाखवतो", तो आवाज मला बोलवत होता.
तसा मी असा कोणावरही विश्वास ठेवत नाही पण तरी मी बसलो खाली आणि बादलीत वाकून बघायला लागलो, अचानक कोणीतरी माझ डोक आत ओढून घेतल, आत गेलो आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला, अस वाटायला लागल की बस्स आता सगळ संपल आपल आयुष्य संपल! श्वास घ्यायला पण मेहनत घ्यायला लागली. त्यातच गच्च मिटून घेतलेले डोळे उघडले समोर दिसत होता एक डोंगर, त्याच्या शेजारून जाणारी एक नदी , दुरवर एक दोन छोटी पण सुंदर घर, अगदी निसर्ग चित्र काढताना जी काही कल्पना आपल्या मनात असते अगदी तस! जवळच कुठला तरी धबधबा असणार कारण त्याचा आवाज ऐकू येत होता.
मी चालत हळू हळू पुढे जायला लागलो, जंगलात आत दाट झाडीत घुसायला लागलो, जसजस आत जात होतो तस तस उकाडा वाढायला लागला होता, पुन्हा थोड्यावेळात तर अगदी अंग भाजायला लागल, चटके बसायला लागले तसा मी मागे पळत निघालो, आणि पळता पळता पाय घसरला आणि पडलो, तोंडावर पडल्यामुळे नाक खरचटल्या सारख झाल होत आणि आग व्हायला लागली, डोळे मिटून एक मिनिटे तिथेच बसलो. "काय मजा आली का?", तोच आवाज परत ऐकू आला, मी डोळे उघडले आणि समोर बाथरूम चे सिलिंग दिसले, गरम पाणी ओसंडून वाहत असावे ते माझ्या पायाला लागत होते आणि मी बाथरूम च्या फरशीवर उताणा पडलो होतो. मगाचसारखाच धबधब्याचा आवाज अजूनही येत होता, भितीने आधीच पुरता घायाळ झालेलो तसाच उठलो आणि बाहेर पळत गेलो!
एक मात्र आज पटल की माणसाने कितीही भुताच्या गोष्टी वाचल्या किंवा बघितल्या तरी एखादा अपरिचित आवाज आला की पहिल्या खेपेला माणूस घाबरतोच!
एक मात्र आज पटल की माणसाने कितीही भुताच्या गोष्टी वाचल्या किंवा बघितल्या तरी एखादा अपरिचित आवाज आला की पहिल्या खेपेला माणूस घाबरतोच!
(क्रमशः)
Comments