कर्नाटक म्हणजे फक्त कन्नड ( कन्नडा का नाही ते पुढे लिहिलंय)
महाराष्ट्र म्हणजे मराठी पण ह्यात सगळ्यात कट्टर म्हणजे तमिळ तिथे हिंदी चा उच्चार सुद्धा चालत नाही.
हे सगळे विषय सतत ऐकू येत असताना, हातात एक पुस्तक आलं, ते म्हणजे "एक शून्य मी"
हे पुलंच पुस्तक वाचताना खूप सुंदर ओळ सापडली. पुल म्हणतात की, आपल्या भाषेवर प्रेम करणारा माणूस जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करू शकतो. म्हणजे आपल्या आईवर प्रेम करणाऱ्याला मातृत्व म्हणजे काय हे कळतं. पण आजकालच्या ह्या राजकारणात ३ भाषा, २ भाषा तर काहीठिकाणी एकच भाषा हा मातृभाषेचा वाद बघितला की वाटत, नक्की आपण त्याच देशात राहतो का की जिथे अनेकतेमधून एकता हा अभिमानाने मान उंचावणारा विषय आहे, की तो देश हरवला?
कर्नाटकात फक्त कन्नड बोला, तामिळनाडू मध्ये फक्त तमिळ ,महाराष्ट्रात फक्त मराठी आणि इतर राज्यात त्यांची त्यांची भाषा! आज कर्नाटक सरकारने सांगितलं की सगळे सरकारी आदेश हे कन्नड मधूनच काढायचे, आणि तुम्हाला काही सरकारी कचेरीत काम असेल तर कन्नड शिका आणि मगच या. आणि जो कन्नडच (कन्नडा नाही) कारण शेवटचा डा हा फक्त हेल काढून बोलायला सोपा जावा म्हणून आहे, असे माझे मत आहे.
सध्या चालू असलेल्या शाळेत कोणती भाषा शिकवायची ह्या विषयावर बोलायचे तर हा विषय उकरून काढणाऱ्या माणसाला पहिल्यांदा शोधले पाहिजे. आम्ही मराठी शाळेत १० वी पर्यंत शकलो आणि आमच्या शाळेत मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी ह्या सगळ्या भाषा शिकवल्या जायच्या, हा आता जरी संस्कृत किंवा हिंदी असा पर्याय असायचा तरी ३ भाषा ह्या असायचाच की. मग आता नवीन काय?
खरं तर ह्या बाबतीत मी पुलंनी लिहिलेल्या विचाराशी खूप सहमत आहे, ते म्हणतात सगळ्या राज्यातल्या शाळांमध्ये पहिलीपासून ते दहावी पर्यंत पुस्तकात प्रत्येक भारतीय भाषेमधली एक एक कविता निवडून घालावी म्हणजे लहानपणापासून प्रत्येकाला प्रत्येक भाषेतील सौंदर्य कळेल आणि जो काय भाषेचा मी पणा आहे तो बंद होईल.
आपली भाषा ही आपली आहे म्हणून तिचा अभिमान असलाच पाहिजे पण त्याचा अर्थ दुसऱ्या सगळ्या भाषा ह्या दुय्यम आहेत हे समजणे चुकीचे. मुंबई, बेंगलोर, पुणे, चेन्नई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये इतक्या भाषेची लोक राहतात की एखाद्यातरी शहरातून परप्रांतीय (परभाषीय) लोक बाहेर काढले तर त्या त्या राज्याची अर्थव्यवस्था कदाचित कोलमडून पडेल.
बाकी, भाषेचा मुद्दा आणून खरोखर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करणे हेच ह्या भाषेच्या राजकारणाच मुख्य कारण आहे. त्यामुळं आपण ह्यावर जास्त लक्ष नको द्यायला असा विचार करून चहा घ्यायला मी बाहेर पडतो आणि उडुपीमध्ये गेल्यावर टेबल पलीकडच्याने आपले इंग्रजी ऐकून आपल्याला दुर्लक्षित केलेले पाहून, "अण्णा वंदू tea कोडी" असं म्हणून, चहा च कूपन घेतो.
Comments