आज घरात निवांत असताना, अंगणात पडलेल्या धुळीला बघून माझ्या मनात विचार आला की कसं खेळलो ना आपण, ह्या मातीत, ह्या धुळीत. घातलेले कपडे आणि कपड्याच्या आतसुद्धा सगळं धुळीत माखायचं, पण खेळायची धुंदी कमी व्हायची नाही. विष अमृत, डोंगर का पाणी, विटी दांडू आणि कधी कधी क्रिकेट खेळायला कोणता व्हाट्सअॅप ग्रुप लागायचा नाही; नुसती हाक मारली की सगळी हजर. उन्ह वर चढायला लागली की कोणाच्यातरी घरात जायचं, कॅरमवर पावडर फासायची आणि अगदी हाताला कड येईपर्यंत कॅरम बोर्डवर नेम धरायचा. ज्याला क्वीन निघते त्याला कवर कधीच निघत नाही, असं म्हणायचं आणि ओम भगबुगे वगैरे मंत्र टाकायचे, समोरच्याला नेम चुकायला भाग पाडायचं. कॅरमचा डाव अगदीच जास्त खेचला गेला आणि बसून बसून पाय ओ म्हणायला लागले की बाहेर बघायचं आणि परत अंगणात दंगा करायला घुसायचं. तो चालायचा अगदी अंधार पडेपर्यंत, आणि कधीकधी अंधार पडल्यानंतरही. मग तीन-चार घरातल्या आया बाया आपली कार्टी त्या धुरकटलेल्या अंधारातून अचूक शोधून काढायच्या आणि पाठीत रपारप फटके देऊन घराकडे ओढत न्यायच्या.
"अभ्यास करत जा की रे कधीतरी, परीक्षेत काय अंगावरची धूळ झटकून येणार काय?" असं म्हणत मारून-मुटकून सोमवारी शाळेत मागितलेल्या अभ्यासासाठी बसवायचं, असा रविवारचा दिनक्रम चालूच असायचा.
खरं तर ही रविवारची संस्कृती होती; तेव्हा मुलांना दिवसभर सांभाळायची चिंता नव्हती. गल्लीतली मोठी पोर, मोठ्या भावासारखी बारक्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन हिंडायची. मोठ्यांचा आबादुबी, लपाछपीचा डाव चालू झाला की लहान मूल आपडी थापडी गुळाची पापडी खेळायची. कधी कधी क्रिकेटमध्ये एखादा गडी कमी पडला की लहानांना मोठ्यांचा खेळात लिंबू टिंबू बनायची संधी मिळायची. असं करत दिवस जायचा. आमचा बारक्या, सोन्या वगैरे जेवत नाहीत अशी काळजी आईबापाला नसायची. दिवसभर हिंडून पोरगं आपोआप भरपेट जेवायचं आणि पडल्या पडल्या ताणून द्यायचं.
मुलांच्या हातात कॅरमच्या स्ट्रायकरऐवजी मोबाईल नावाचा एक राक्षस आलाय आणि त्यानं अंगण नावाची ही रविवारची संस्कृती संपवली आहे. आज मुलांना लपाछपी खेळूया का विचारलं तर कदाचित ती आपल्यालाच विचारतील की Play Store वर आहे का म्हणून. आपण गल्लीतल्या एकाच्या घरी असलेल्या CD प्लेयरवर भाड्याने पिक्चरची CD आणून बघायचो, आताच्या मुलांना OTT सब्सक्रिप्शन मिळतं.
आपल्याला सुद्धा आता रविवारसोबत शनिवारी पण सुट्टी आहे, पण असं खुलं राहायला आणि खेळायला सवंगडी नाहीत. सवंगडी तर सोडाच, पण आता अंगण तस राहीलं नाही.
आयुष्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन होतं, जे आता एक्स्पायर झालंय. म्हणून कायम मनात हाच प्रश्न घोंगवतो की हे प्रीमियम सब्सक्रिप्शन आता रिन्यू होईल का?
Comments