Skip to main content

रविवारच Subscription

    आज घरात निवांत असताना, अंगणात पडलेल्या धुळीला बघून माझ्या मनात विचार आला की कसं खेळलो ना आपण, ह्या मातीत, ह्या धुळीत. घातलेले कपडे आणि कपड्याच्या आतसुद्धा सगळं धुळीत माखायचं, पण खेळायची धुंदी कमी व्हायची नाही. विष अमृत, डोंगर का पाणी, विटी दांडू आणि कधी कधी क्रिकेट खेळायला कोणता व्हाट्सअॅप ग्रुप लागायचा नाही; नुसती हाक मारली की सगळी हजर. उन्ह वर चढायला लागली की कोणाच्यातरी घरात जायचं, कॅरमवर पावडर फासायची आणि अगदी हाताला कड येईपर्यंत कॅरम बोर्डवर नेम धरायचा. ज्याला क्वीन निघते त्याला कवर कधीच निघत नाही, असं म्हणायचं आणि ओम भगबुगे वगैरे मंत्र टाकायचे, समोरच्याला नेम चुकायला भाग पाडायचं. कॅरमचा डाव अगदीच जास्त खेचला गेला आणि बसून बसून पाय ओ म्हणायला लागले की बाहेर बघायचं आणि परत अंगणात दंगा करायला घुसायचं. तो चालायचा अगदी अंधार पडेपर्यंत, आणि कधीकधी अंधार पडल्यानंतरही. मग तीन-चार घरातल्या आया बाया आपली कार्टी त्या धुरकटलेल्या अंधारातून अचूक शोधून काढायच्या आणि पाठीत रपारप फटके देऊन घराकडे ओढत न्यायच्या.


"अभ्यास करत जा की रे कधीतरी, परीक्षेत काय अंगावरची धूळ झटकून येणार काय?" असं म्हणत मारून-मुटकून सोमवारी शाळेत मागितलेल्या अभ्यासासाठी बसवायचं, असा रविवारचा दिनक्रम चालूच असायचा.


खरं तर ही रविवारची संस्कृती होती; तेव्हा मुलांना दिवसभर सांभाळायची चिंता नव्हती. गल्लीतली मोठी पोर, मोठ्या भावासारखी बारक्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन हिंडायची. मोठ्यांचा आबादुबी, लपाछपीचा डाव चालू झाला की लहान मूल आपडी थापडी गुळाची पापडी खेळायची. कधी कधी क्रिकेटमध्ये एखादा गडी कमी पडला की लहानांना मोठ्यांचा खेळात लिंबू टिंबू बनायची संधी मिळायची. असं करत दिवस जायचा. आमचा बारक्या, सोन्या वगैरे जेवत नाहीत अशी काळजी आईबापाला नसायची. दिवसभर हिंडून पोरगं आपोआप भरपेट जेवायचं आणि पडल्या पडल्या ताणून द्यायचं.


मुलांच्या हातात कॅरमच्या स्ट्रायकरऐवजी मोबाईल नावाचा एक राक्षस आलाय आणि त्यानं अंगण नावाची ही रविवारची संस्कृती संपवली आहे. आज मुलांना लपाछपी खेळूया का विचारलं तर कदाचित ती आपल्यालाच विचारतील की Play Store वर आहे का म्हणून. आपण गल्लीतल्या एकाच्या घरी असलेल्या CD प्लेयरवर भाड्याने पिक्चरची CD आणून बघायचो, आताच्या मुलांना OTT सब्सक्रिप्शन मिळतं.


आपल्याला सुद्धा आता रविवारसोबत शनिवारी पण सुट्टी आहे, पण असं खुलं राहायला आणि खेळायला सवंगडी नाहीत. सवंगडी तर सोडाच, पण आता अंगण तस राहीलं नाही.


आयुष्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन होतं, जे आता एक्स्पायर झालंय. म्हणून कायम मनात हाच प्रश्न घोंगवतो की हे प्रीमियम सब्सक्रिप्शन आता रिन्यू होईल का?





Comments

खूप छान 💗
Anonymous said…
मस्तच 👌🏻
Anonymous said…
Mastch

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media